पेरणीची घाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवू शकते; कृषीमंत्र्यांचे 15 जूनपर्यंत थांबण्याचे आवाहन

पेरणीची घाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवू शकते; कृषीमंत्र्यांचे 15 जूनपर्यंत थांबण्याचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेल्या असह्य उष्णतेमुळे आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहेत. सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

दत्ता भरणे म्हणाले की, "मी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगतो की, 12 जून ते 15 जून दरम्यानच्या पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. सध्यातरी मराठवाडा आणि खान्देश भागात सर्वदूर पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा योग्य अंदाज घेऊनच पेरणी करावी, घाई करू नये," असे आवाहन त्यांनी केले आहे. 

"मे आणि जून महिन्यांत राज्यातील काही ठिकाणी वादळी पाऊस झाला, ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः जळगाव, अमरावती आणि बुलढाणा या भागांत पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. राज्यातील एकूण 24 जिल्ह्यांना या वादळी पावसाचा फटका बसला असून, सुमारे 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतीसोबतच लोकांच्या घरांचे देखील नुकसान झाले आहे. या संदर्भात मी सर्व ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारी मदत करता येईल," असे दत्ता भरणे यांनी म्हटले.