'मी पोस्टमनच' वक्तव्यावरून खळबळ; धैर्यशील मोहिते पाटलांनी गोरेंना सुनावले

'मी पोस्टमनच' वक्तव्यावरून खळबळ; धैर्यशील मोहिते पाटलांनी गोरेंना सुनावले

सोलापूर (प्रतिनिधी) : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत थेट पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातच लढत पाहायला मिळत आहे. येथे भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंत देशमुख यांच्यात निवडणूक होत आहे. मात्र, ही निवडणूक पालकमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची झाली असून जयकुमार गोरे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही, साधा कोतवालही नमस्कार घालत नाही, असे म्हणत मोहिते पाटलांना जयकुमार गोरेंनी लक्ष्य केलं होतं. त्यावर, आता धैर्यशील मोहिते पाटलांनी पलटवार केला आहे. 

मोहिते पाटील कुटुंबावर टीका केल्याशिवाय जयकुमार गोरे यांचं दुकान चालत नाही, असा पलटवार खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय. ‘’जयकुमार गोरे हे पालकमंत्री आहेत की पोस्टमन, हे त्यांनी आधी ठरवावं, पालकत्व या शब्दाचा अर्थ त्यांनी डिक्शनरीमध्ये शोधावा, अशी खोचक टीका देखील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली. दरम्यान मागील दोन दिवसात पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पंढरपूर तालुक्यात केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत, या केळी उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे. यावेळी, सोलापूर विधानपरिषद मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. तसेच, जयकुमार गोरे यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलंय. 

मोहिते पाटील कुटुंबाला सोलापूरच्या जनतेने उभं केलंय, आम्हाला संपवायचं की उभं करायचं हे जनता ठरवेल. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत असलो तरी पवार साहेब, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांसह सर्वच  मुख्यमंत्र्यांनी ज्या त्या काळात आम्हाला मदत केली. ज्यांनी मदत केली त्यांचे आम्ही जाहीर आभार मानले आहेत. मला हे समजतं नाही की, ही विधानपरिषदेची निवडणूक आहे, मोहिते पाटील कुटुंबातील कोणी उमेदवार नाही तरी हे आमच्यावर टीका करत सुटलेत, असा टोलाही मोहिते पाटलांनी लगावला.