देवेंद्रजी, आणखी किती अंधभक्ती करणार? रोहित पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल

देवेंद्रजी, आणखी किती अंधभक्ती करणार? रोहित पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल

मुंबई: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली ३६ दिवस चाललेल्या आक्रमक आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, राजीनाम्यानंतर संपूर्ण भाजप धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत प्रधानांच्या निर्णयाचे कौतुक केले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल करत "किती अंधभक्ती करणार?" असा खोचक सवाल विचारला आहे.

"शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्यांचं कौतुक करताय?" - रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी X (ट्विटर) वर देवेंद्र फडणवीसांची पोस्ट रिपोस्ट करत टीका केली. ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस साहेब, शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक आपण करत असाल, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचं सांगत असाल तर याला काय म्हणावं? राजीनामा त्यांनी चुकीमुळे दिलेला नाही तर उपकार केलाय, हे आपल्याला सुचवायचंय का?"

"जखमी तरुणांबद्दल सहानुभूती नाही वाटली?"

पुढे बोलताना रोहित पवारांनी आंदोलकांवरील लाठीचार्जाची आठवण करून दिली. "गेले महिनाभर महिलांसह हजारो युवकांनी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, २०-२५ दिवसांचे उपोषण केले. काहींनी पॅलेट गनचा सामना केला तर अनेक जण आजही रुग्णालयात उपचार घेत आहेत. या सगळ्याबाबत आपल्याला कधी सहानुभूती वाटली नाही, पण आज धर्मेंद्र प्रधानांबद्दल सहानुभूती वाटत आहे. किती अंधभक्ती करणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काय होती देवेंद्र फडणवीसांची पोस्ट?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ लिहिले होते की, "धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण क्षेत्रात 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' (NEP), 'पीएम श्री' शाळांचा उपक्रम आणि प्रवेश परीक्षांचा १९ भाषांपर्यंत विस्तार यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. व्यापक जनहिताप्रती आपली वचनबद्धता दर्शवत त्यांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणे हेच एका खऱ्या भाजप कार्यकर्त्याचे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे."

फडणवीसांच्या या समर्थनार्थ पोस्टवर रोहित पवारांनी घेतलेल्या आक्रमकक्षेपामुळे आता भाजप नेते त्यांना काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.