शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! प्रोत्साहन अनुदान, कर्जमाफी आणि पीक विम्यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची महत्त्वाची घोषणा

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! प्रोत्साहन अनुदान, कर्जमाफी आणि पीक विम्यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची महत्त्वाची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पीक विमा योजनेच्या धोरणात यंदाही कोणताही बदल करण्यात येणार नसून, मागील वर्षीप्रमाणेच ही योजना सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रोत्साहन अनुदानाबाबत बोलताना, राज्यात सुमारे 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी असून, पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. अनेक शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यांना निधी देण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले. तसेच दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी पुढील काही दिवसांत तेथेही चांगल्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात सरासरी 84 टक्के पेरणी पूर्ण झाली असून, मका आणि सूर्यफूल पिकांच्या लागवडीत वाढ झाली आहे.

सोयाबीन पेरणीबाबत काही तक्रारी आल्या असल्या तरी, खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खताच्या उपलब्धतेबाबत चिंता करू नये, असे आवाहनही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.