'मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस'; मुंबईला जाण्याचा मार्ग का बदलला? अजय बारसकरांची बोचरी टीका

'मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस'; मुंबईला जाण्याचा मार्ग का बदलला? अजय बारसकरांची बोचरी टीका

मुंबई (प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन खोटं होतं. जरांगे यांच्यासारखा खोटारडा, बंडलबाज आणि भंपक माणूस नाही, अशी बोचरी टीका मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारसकर यांनी केली आहे. मनोज जरांगे हे अॅक्टिंग करतात, त्यांचं ऑस्करसाठी नामांकन पाठवलं पाहिजे. कधी जोशात बोलतात, कधी हसवतात, तर कधी रडवतात, अशा शब्दांत बारसकर यांनी जरांगेंवर निशाणा साधला.

 मराठा समाज अशा व्यक्तीच्या मागे लागला आहे, असा दावा करत अजय बारसकर म्हणाले की, पत्रकार परिषदेत जरांगे स्वतः म्हणतात की, मी भीक मागतो. आता लोकांना येण्यासाठी ते भीक मागत आहेत. आधीचा त्यांचा दरारा कुठे गेला? पूर्वी लोक त्यांच्यावर प्रेम करत होते आणि न बोलावताही आंदोलनात सहभागी होत होते. मात्र, आता त्यांच्यावर अशी वेळ आली आहे की लोकांना येण्याचं आवाहन करावं लागत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला आहे. यावरही अजय बारसकर यांनी सवाल उपस्थित केला. याआधी ज्या मार्गाने ते मुंबईकडे गेले, त्या मार्गावर आता लोक येणार नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. लोकांना जरांगेंचा भंपकपणा समजला आहे, असा दावा त्यांनी केला.

 तीन वेळा आम्ही मुंबईकडे गेलो, पण काय मिळालं? मनोज जरांगे पाटील मुंबईला कशासाठी चालले आहेत आणि काय मिळवण्यासाठी चालले आहेत? दीड तास पत्रकार परिषद घेऊन बोलतात, मात्र नेमकं कशासाठी मुंबईला जात आहेत, हे सांगत नाहीत. त्यामुळे लोकांनी याचा विचार आणि चिंतन करावं, असंही अजय बारसकर म्हणाले. मराठा समाजातील काही घटक जरांगे पाटील यांच्या नादी लागले आहेत. जरांगे यांनी मराठा समाजाचं मोठं नुकसान केलं आहे, असा आरोपही बारसकर यांनी केला. त्यांचा केवळ रोष आहे, मात्र नेमकं मागायचं काय हेच त्यांना माहिती नाही, असं ते म्हणाले.

 मराठा समाजाला आधीच आरक्षण आहे. ओबीसीचे दाखले मिळतात आणि ज्यांना ते मिळत नाहीत, त्यांना एसीईबीसीचे दाखले मिळतात, असा दावा अजय बारसकर यांनी केला. जरांगे यांच्याकडे अभ्यासक किंवा वकील आहे का? असा सवाल करत यापूर्वी जितक्या संख्येने लोक आले होते, तितक्या संख्येने आता लोक त्यांच्यासोबत येणार नाहीत. मांडव भरला नाही, अशी परिस्थिती असल्याचंही त्यांनी म्हटलं.

 दरम्यान, ईडीच्या नोटीसचा मुद्दा उपस्थित करत अजय बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे आले आहेत आणि मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारमधील काही लोकांनी जरांगेंना मदत केली आणि दूध पाजत पाजत मोठं केलं, असंही बारसकर म्हणाले. जरांगे कोणाच्या डिफेंडरमध्ये फिरतात, गाडी कुठून आली, पैसे कुठून आले आणि लीलावती रुग्णालयाचा खर्च कुठून झाला, याचा लोकांनी विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

 इमेज आणि ब्रँडिंग कुणी केलं, सत्ताधारी आणि महाविकास आघाडीतील लोक त्यांच्यामागे आहेत आणि आलटून-पालटून मदत करतात, असा आरोपही अजय बारसकर यांनी केला. आज एकनाथ भाई म्हणायचं, तर दुसऱ्याची सुपारी घेतल्यानंतर त्यांना शिव्या द्यायच्या, असा आरोप करत मनोज जरांगे यांना नेमकं काय पाहिजे, ते त्यांनी कागदावर लिहून द्यावं. मी मध्यस्थी करतो, असंही अजय बारसकर म्हणाले.

 सरकार एकतर हो म्हणेल किंवा नाही म्हणेल. मात्र, ज्या मागण्या कधीच पूर्ण होणार नाहीत, ज्या कधीच मिळणार नाहीत, अशाच मागण्या जरांगे करत असल्याचा दावा त्यांनी केला. ब्रह्मदेव जरी खाली आला तरी मनोज जरांगे जे मागत आहेत ते मिळणार नाही, असा दावा करत अजय बारसकर यांनी जरांगेंना पुन्हा लक्ष्य केलं. मनोज जरांगे हे चालबाज व्यक्ती आहेत. गर्दी झाली तर मुंबईला जाणार, अन्यथा गॅलेक्सी हॉस्पिटलला जाणार, असा गंभीर आरोपही अजय बारसकर यांनी केला आहे.