शरद पवारांनी रत्नागिरीच्या ‘फणस किंग’ला मोदींची भेट घडवली; मोबाईलमध्ये काय दाखवलं? कोण आहेत मिथिलेश देसाई?
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा काल, 10 ऑगस्ट रोजी दिल्लीत पार पडला. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या सोहळ्यादरम्यान शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. याचवेळी शरद पवारांनी रत्नागिरीतील तरुण शेतकरी मिथिलेश देसाई यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट करून दिली. मिथिलेश देसाई यांनी फणस उत्पादन आणि त्यासंदर्भातील आपल्या कामाची माहिती पंतप्रधान मोदींना दिली.
मिथिलेश देसाई हे रत्नागिरीचे असून त्यांना ‘जॅकफ्रूट किंग’, म्हणजेच ‘फणस किंग’ म्हणून ओळखलं जातं. ते लंडनस्थित सर्क्युलरिटी इनोव्हेशन हबचे भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. शरद पवारांनी आपल्या नातीच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी मिथिलेश देसाई यांनाही आमंत्रित केलं होतं. याच कार्यक्रमात त्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
यावेळी मिथिलेश देसाई यांनी पंतप्रधान मोदींना फणस उत्पादनासोबतच त्यासंबंधित इतर उपक्रमांचीही माहिती दिली. यावेळी त्यांनी मोबाईलमध्ये काही माहिती आणि कामाची माहितीही दाखवल्याचं समोर आलं आहे.
मिथिलेश देसाई हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यापूर्वी ते जर्मनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करत होते. मात्र, मायदेशी परतल्यानंतर त्यांनी फणसाची शास्त्रीय पद्धतीने मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यास सुरुवात केली. आज ते तब्बल 86 प्रकारच्या फणसाची लागवड करतात.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा परिसरात मिथिलेश देसाई ‘फणस किंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी सर्क्युलर इकॉनॉमी इकोसिस्टम आणि सर्क्युलर इनोव्हेशन हबला प्रोत्साहन देण्यासाठी लंडनमधील ‘जॅकफ्रूट ऑफ इंडिया’ या कंपनीसोबत करार केला.
या कराराचा फायदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1,000 हून अधिक शेतकऱ्यांना झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत आंब्याच्या कोयी, फळांची साल, काजू आणि इतर कृषी कचऱ्यापासून विविध उत्पादनं तयार करण्यावर काम केलं जात आहे.
मिथिलेश देसाई यांच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबतच अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध झाला आहे. लंडनमधील ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचेही प्रयत्न या माध्यमातून केले जात आहेत.त्यामुळे रत्नागिरीच्या या ‘फणस किंग’ची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेली भेट आणि त्यांच्या कामाची मोदींना दिलेली माहिती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.




