मनोज जरांगेंना ‘डिफेंडर’ देणारे सुभाष भोसले कोण? कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने दिली सविस्तर माहिती

मनोज जरांगेंना ‘डिफेंडर’ देणारे सुभाष भोसले कोण? कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने दिली सविस्तर माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरू आहे. जरांगे पाटील यांच्याकडून सत्ताधारी पक्षातील नेते आणि मंत्र्यांवर होत असलेल्या शिवराळ भाषेतील वक्तव्यांची जेवढी चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर होत आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या दौऱ्यात आणखी एका गोष्टीची चर्चा सुरू आहे. ती म्हणजे मनोज जरांगे पाटील वापरत असलेली डिफेंडर गाडी.

पांढऱ्या रंगाची नवी कोरी डिफेंडर पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. याबाबत स्वतः मनोज जरांगे पाटील यांनीही खुलासा केला होता. ही गाडी आपल्याला एका समाजबांधवाने वापरण्यासाठी दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता या डिफेंडर गाडीचे मालक सुभाष भोसले यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याकडे असलेली डिफेंडर ही आलिशान गाडी सांगोला तालुक्यातील चिक महूद येथील व्यापारी आणि प्रगतशील शेतकरी सुभाष भोसले यांनी दिली आहे. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की, मराठा समाजासाठी आंदोलने आणि उपोषणे करून मनोज दादांची तब्येत खूपच खालावली आहे. त्यातच पुन्हा ते पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचं समजल्यावर आपण डिफेंडर गाडी विकत घेतली.

या गाडीत पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी बसावं, ही आपली इच्छा होती. त्यामुळे पंढरपूर येथील सरकोलीच्या सभेनंतर आपण त्यांना ही गाडी वापरण्यासाठी दिली. वास्तविक, या गाडीत असलेल्या सुविधांमुळे मनोज जरांगे यांचा प्रवासातील त्रास कमी व्हावा, हीच आपली भावना होती, असं भोसले यांनी सांगितलं.

आपल्या नवीन गाडीत देवाने बसावं, अशी इच्छा होती आणि आमच्या समाजासाठी मनोज जरांगे हे देवच आहेत, अशी भावनाही सुभाष भोसले यांनी व्यक्त केली.

डिफेंडर या गाडीची किंमत तब्बल एक कोटी 90 लाख रुपये असून, यासाठी सुभाष भोसले यांनी दीड कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. घरात सराफाचा म्हणजेच सोने-चांदीचा व्यवसाय असून शेतीही अत्याधुनिक पद्धतीने करणाऱ्या भोसले बंधूंची मनोज जरांगे पाटील यांच्यावर अतूट निष्ठा आहे. त्यातूनच त्यांनी ही आलिशान गाडी जरांगे पाटील यांना वापरण्यासाठी दिली.

सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी या आलिशान गाडीत बसण्यास नकार दिला होता. मात्र, सुभाष भोसले यांनी केलेल्या विनंतीनंतर आता मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा याच डिफेंडरमधून सुरू आहे.या गाडीत प्रवास करताना मनोज जरांगे यांना कमी त्रास व्हावा, अशी सुभाष भोसले यांची भावना आहे. त्यामुळे भोसले यांनी दिलेल्या या डिफेंडरमधून मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा अधिक सुखकर होताना दिसत आहे.