'विधीमंडळातील २-५ आमदार फुटले म्हणून मूळ पक्षाची मालकी ऐऱ्यागैऱ्याकडे जात नाही'; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार
मुंबई: शिवसेना कोणाची आणि पक्षाचे चिन्ह कोणाचे, यावरून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गट आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "विधीमंडळातील २-५ आमदार आणि काही खासदार सोडून गेले किंवा फुटले, म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐऱ्यागैऱ्याकडे कशी जाऊ शकते?" असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

'मूळ पक्ष वेगळा आणि विधीमंडळ पक्ष वेगळा'
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, "मूळ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे सोपवली आहे आणि आम्ही सर्वजण मूळ पक्षासोबतच काम करत आहोत. निवडणूक आयोगाने ठाण्याच्या 'टिकूजीराव' (एकनाथ शिंदे) यांना परस्पर पक्ष दिला. मात्र, विधीमंडळातील फुटलेला गट वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा आहे."
पंतप्रधान मोदींवर न्यायालयावर दबाव आणल्याचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले, "पंतप्रधान मोदी हे पक्षांतर आणि पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे."
'गद्दारांना जेवायला घालायला वेळ आहे, पण संसदेत यायला नाही'
पंतप्रधानांच्या भेटीवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी केटरिंग सर्व्हिस सुरू केली आहे की काय, असा प्रश्न पडतो. गद्दारांनी यावे आणि खाऊन जावे, अशी परिस्थिती आहे. विरोधी पक्ष (तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना) गेल्या १६ दिवसांपासून संसदेत पंतप्रधानांची मागणी करत आहेत, पण तिकडे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. अपात्रतेचा गुन्हा असलेल्यांना पंतप्रधान बोलावतात, ढोकळा-फापडा खायला घालतात आणि 'मी तुमच्या पाठीशी आहे' असा संदेश देऊन न्यायालयावर दबाव आणतात."
शेवटी बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. "या देशाची घटना आणि सर्वोच्च न्यायालय हे नरेंद्र मोदींपेक्षा मोठे आहे. आम्हाला संविधानानुसार निष्पक्ष न्याय हवा आहे, कोणाची मेहेरबानी किंवा विकत घेतलेला न्याय नको," असे राऊत यांनी ठामपणे सांगितले.




