रात्री एफडीएला येणाऱ्या फोनबाबत तुकाराम मुंडेंचा खुलासा; आता दारू विक्रेत्यांवरही होणार कडक कारवाई

रात्री एफडीएला येणाऱ्या फोनबाबत तुकाराम मुंडेंचा खुलासा; आता दारू विक्रेत्यांवरही होणार कडक कारवाई

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाचा (FDA) कारभार हाती घेतल्यापासून धडक कारवायांचा धडाका लावणारे धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भेसळयुक्त दूध, दही, अनालॉग पनीर आणि गुटख्यावर कठोर कारवाई केल्यानंतर आता एफडीएचा मोर्चा दारू विक्रेत्यांकडे वळणार असल्याचे संकेत स्वतः तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत.

रात्रीच्या वेळी येणाऱ्या तक्रारी आणि कर्मचाऱ्याची व्यथा
तुकाराम मुंडे यांनी एका मुलाखतीदरम्यान एफडीएच्या हेल्पलाईन नंबरवर येणाऱ्या फोनबाबत एक गमतीशीर आणि महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, "नागरिकांच्या तक्रारींसाठी एफडीएने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. मात्र, या नंबरवर रात्रीच्या वेळी दारू पिऊन लोकांचे फोन येतात. 'दारूची चव बरोबर नाही', 'दारू चढत नाही' अशा तक्रारी लोक फोन करून करतात, एवढेच नाही तर माझा वैयक्तिक नंबरही मागतात."

त्यांनी पुढे सांगितले की, "एकदा नाईट शिफ्टमध्ये काम करणारा कर्मचारी माझ्याकडे आला आणि म्हणाला, 'सर, मला नाईट शिफ्ट नको, दिवसाची शिफ्ट द्या.' मी त्याला विचारले की, 'रात्री तर काम कमी असेल ना?' यावर तो म्हणाला, 'नाही सर, लोक रात्री पिऊन फोन करतात आणि तुमचा नंबर मागतात.'"

भेसळयुक्त दारूविक्रेत्यांची खैर नाही!
सध्या एफडीएवर कामाचा मोठा ताण असून, भेसळयुक्त आणि बोगस दारूवर कारवाई करण्याचे नियोजनही लाईनमध्ये आहे, असे मुंडेंनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काळात भेसळयुक्त दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलाखतीत बोलताना तुकाराम मुंडे यांनी हेदेखील नमूद केले की, त्यांनी आयुष्यात कधीही दारू पिलेली नाही.
 

राज्यभरात एफडीएच्या धडक कारवायांचे कौतुक
महाराष्ट्रभरात एफडीएकडून सुरू असलेल्या धाडींचे सर्वसामान्य जनतेकडून मोठे कौतुक होत आहे. शेतातच भेसळयुक्त पनीर आणि दूध नष्ट करण्यापासून ते बड्या हॉटेल्स आणि गुटखा माफियांवर केलेल्या कारवाईमुळे तुकाराम मुंडेंच्या कामाचा दणका पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.