'कंत्राटदार कंटाळून का पळून गेले?'; गडकरींसोबतच्या संभाषणाचा संदर्भ देत राज ठाकरेंचा महामार्ग कामावरून संतप्त सवाल

'कंत्राटदार कंटाळून का पळून गेले?'; गडकरींसोबतच्या संभाषणाचा संदर्भ देत राज ठाकरेंचा महामार्ग कामावरून संतप्त सवाल

 माणगाव/रायगड: गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या महामार्गावरील माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी स्थानिक राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचाराचे टक्के आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेवर जोरदार प्रहार केला.

'नितीन गडकरींशी काय बोलणे झाले?'
महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत झालेल्या संवादाचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, "मुंबई-गोवा महामार्गाबाबत मी एकदा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना फोन केला होता. त्यावर 'कंत्राटदार कंटाळून पळून गेले' असे गडकरींनी मला सांगितले. पण हे कंत्राटदार नक्की कोणामुळे पळून गेले? स्थानिक राजकीय हस्तक्षेप किती आहे? कामाचा दर्जा सुधारण्याऐवजी आपल्याला किती 'टक्के' मिळतील, याचाच विचार इथे केला जात आहे."

 'सगळे आमदार एकत्र आले असते तर...'

कोकणातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि स्थानिक आमदारांवर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले, "कोकणात फिरल्यानंतर 'रस्ते लागणे' काय असते ते कळते. गेली १५ ते १७ वर्षे तीच परिस्थिती आहे; तेच खड्डे, तोच ट्रॅफिक जाम आणि निवडणुकीत तेच विषय! जर कोकणातील सगळे आमदार एकत्र आले असते, तर या रस्त्यासाठी इतकी वर्षे वाट पाहावी लागली नसती."

 'उद्योगांत भागीदार व्हा, जमिनी विकू नका!'

स्थानिक नागरिकांच्या जमिनी आणि भविष्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी कोकणवासीयांना महत्त्वाचा सल्ला दिला. "सध्या महाराष्ट्रात जमिनी विकणे एवढाच धंदा सुरू आहे. आपल्या जमिनी आणि पाण्यावर बाहेरची माणसे पोसली जात आहेत. त्यामुळे विकासाची फळे स्थानिकांच्या वाट्याला येणार नसतील, तर असा विकास काय कामाचा? तिसऱ्या मुंबईत सरकार मोठे प्रकल्प आणत आहे, पण तिथल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळणार का, की बाहेरचे कामगार आणणार? म्हणूनच स्थानिकांनी आपल्या जमिनी न विकता आलेल्या उद्योगांमध्ये भागीदार व्हावे," असे आवाहन त्यांनी केले.