संजय राऊतांच्या कौतुकाने खासदार राजाभाऊ वाजे भावूक; पत्रकार परिषदेत अश्रू अनावर

संजय राऊतांच्या कौतुकाने खासदार राजाभाऊ वाजे भावूक; पत्रकार परिषदेत अश्रू अनावर

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच ठाकरे गटातील खासदारांच्या भूमिकेवर मोठी चर्चा सुरू आहे. काही खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षनिष्ठा आणि शिवसेनेशी असलेल्या भावनिक नात्यावर भाष्य करत बंडखोर खासदारांवर टीका केली.

पत्रकार परिषदेदरम्यान राऊत यांनी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या निष्ठेचे विशेष कौतुक केले. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक यांच्यातील संबंधांविषयी बोलताना त्यांनी वाजे यांचा उल्लेख एकनिष्ठ कार्यकर्ता आणि खासदार म्हणून केला.

राऊत यांचे शब्द ऐकताना राजाभाऊ वाजे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कॅमेऱ्यासमोरच त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि त्यांनी दोन वेळा डोळे पुसल्याचे दृश्य उपस्थितांच्या नजरेत भरले. पक्षावर आलेल्या संकटाच्या काळात आणि सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये वाजे यांच्या भावना अनावर झाल्याचे दिसून आले.

या पत्रकार परिषदेला संजय राऊत यांच्यासोबत खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. दरम्यान, दिल्लीतील राजकीय हालचालींमुळे शिवसेनेतील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.