ऑपरेशन टायगर’मागे भाजपचा हात? सहा खासदारांच्या बंडावर अंजली दमानियांचे गंभीर आरोप

ऑपरेशन टायगर’मागे भाजपचा हात? सहा खासदारांच्या बंडावर अंजली दमानियांचे गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत लोकसभा अध्यक्षांकडे आपला दावा सादर केला आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

 या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देताना अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, एकनाथ शिंदे यांच्यामार्फत राबवले जात असलेले ‘ऑपरेशन टायगर’ हे केवळ शिंदे गटाचे नसून त्यामागे भाजपची रणनीती असू शकते.दमानिया म्हणाल्या की, त्या कोणत्याही पक्षाच्या समर्थक नसल्या तरी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी पक्षांतर करत असतील तर तो लोकशाहीसाठी चिंतेचा विषय आहे. त्यांनी दावा केला की, बंडखोर खासदारांपैकी एका खासदाराला मंत्रीपदासह मोठ्या आर्थिक ऑफरचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे.

याशिवाय, या संपूर्ण प्रकरणामागे भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. लोकसभेत आणि राज्यसभेत संख्याबळ वाढवण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.दमानिया यांनी पुढे ठाकरे आणि पवार गटांनी या विषयावर अधिक आक्रमक भूमिका घ्यावी, तसेच लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा द्यावा, असे आवाहन केले.

दरम्यान, या आरोपांवर संबंधित पक्षांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.