हाथी चले बाजार में..; अमित शाहांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदेंची जोरदार बॅटिंग, मोदींच्या निवासाबाहेरील आंदोलनावरही निशाणा

हाथी चले बाजार में..; अमित शाहांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदेंची जोरदार बॅटिंग, मोदींच्या निवासाबाहेरील आंदोलनावरही निशाणा

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमितभाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील. त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवण्याची गरज नाही, असं म्हणत शिंदे यांनी शाह यांची ठाम बाजू मांडली.

एकनाथ शिंदे म्हणाले, नक्षलवादावर कारवाई करणारे, कलम 370 हटवणारे अमित शाह यांना देशभक्तीचं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. 'हाथी चले बाजार में.' बाकी पुढचं मी काय बोलत नाही," असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

पुढे बोलताना शिंदे यांनी शिवसेना आणि भाजपची युती ही वैचारिक असल्याचं सांगितलं. आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी आहे. आम्ही बार्गेनिंग करणारे नाही. मोदीजी एनडीएचे प्रमुख आहेत आणि ते जो निर्णय घेतील तो देशहिताचाच असेल, असं ते म्हणाले.

विरोधकांच्या आंदोलनावर टीका करताना शिंदे म्हणाले, सभागृहात चर्चा करणं आणि आंदोलन करणं हा विरोधकांचा अधिकार आहे. मात्र जंतर-मंतरऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणं हे एक मोठं षड्यंत्र होतं. केवळ राजकीय स्टंट करण्यापेक्षा सकारात्मक चर्चा व्हायला हवी. अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी ही निव्वळ राजकारण आहे, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी अरविंद सावंत यांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. आम्ही स्थापन केलेलं सरकार संविधान आणि कायद्याचं पूर्ण पालन करूनच स्थापन झालं. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातही स्पष्ट उल्लेख आहे. जनतेच्या न्यायालयात जाण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेनेच उत्तर दिलं आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.