मोठी खुशखबर! फक्त 1 रुपयात मिळणार सरकारी जमीन; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः शेतकरी विधवांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.'राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजने'अंतर्गत आता आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना केवळ 1 रुपया नाममात्र दराने शासकीय पडीक जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या जमिनीचा वापर विविध व्यवसाय, शेतीपूरक उपक्रम, जनावरांच्या चाऱ्याचे उत्पादन, बांबू लागवड, नर्सरी उभारणी तसेच अपारंपारिक ऊर्जा स्रोतांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी करता येणार आहे.सरकारने या योजनेसाठी काही नियमही निश्चित केले आहेत. चारा उत्पादनासाठी जमीन 3 वर्षांसाठी, तर बांबू लागवडीसाठी 10 वर्षांपर्यंत वापरता येणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून, 'माविम' आणि 'उमेद' अंतर्गत कार्यरत महिला बचत गटांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.या निर्णयामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील महिलांना रोजगार, स्वावलंबन आणि उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




