राष्ट्रवादीत मोठा फेरबदल: रुपाली चाकणकरांची जागा आता वैशाली नागवडे सांभाळणार; सुनील तटकरेंची मोठी घोषणा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देऊन जबाबदारी सोपवली.

भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
नियुक्तीनंतर वैशाली नागवडे आणि निखिल ठाकरे यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जाऊन दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.
वैशाली नागवडे नेमक्या कोण? (राजकीय प्रवास)
· पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)
· पद: महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष
· जन्मतारीख: ११ फेब्रुवारी १९७३
· शिक्षण: बी.कॉम (एस. पी. कॉलेज)
महत्त्वाची पदे व अनुभव:
· २००२-०५: संचालक - अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
· २००५-२०१६: संचालक - महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)
· २००७-२०१२: सदस्य - पंचायत समिती, दौंड
· २००९-२०२१: अध्यक्ष - पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस
· २०१०: अध्यक्ष - पंचायत राज कमिटी, महाराष्ट्र राज्य
· २०१३-२०१६: अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)
· २०१४-२०१६: संचालक - NDDB (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आनंद, गुजरात)
· २०१४-२०१६: संचालक - IVRI (इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट, बरेली, उ.प्र.)
"दादांची 'कामाचा माणूस' ही ओळख तळागाळात नेणार" – वैशाली नागवडे
आपल्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना वैशाली नागवडे म्हणाल्या, "माझ्या राजकारणाची सुरुवात दिवंगत अजित पवार यांच्यामुळे झाली. आज ते हवे होते, त्यांची उणीव कायम जाणवत राहील. गेल्या २६ वर्षांचा माझा प्रवास आहे. पंचायत समिती सदस्य, महानंद अध्यक्ष, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अशी १४ वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हे पत्र मिळाल्याने जबाबदारी खूप वाढली आहे. दादांची 'कामाचा माणूस' ही ओळख आम्हाला आणखी तळागाळात घेऊन जायची आहे."
काँग्रेसवर जोरदार टीका:
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेचा समाचार घेताना त्या म्हणाल्या, "काँग्रेसला सुनेत्रा पवार यांचे दुःख कळायला हवे होते. किती मोठे दुःख पचवून त्या या पदावर आल्या आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. बारामतीत विधानसभेला मदत केली म्हणायचे आणि दुसरीकडे अशा प्रकारे टीका करायची, हे काँग्रेसला बिलकूल शोभणारे नाही. याविरोधात आम्ही पुणे शहरात आंदोलनही केले आहे."
"पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळाली" – निखिल ठाकरे
युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निखिल ठाकरे म्हणाले, "पक्षाकडून आज मोठी जबाबदारी मिळाली आहे. पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहत असतो आणि संघटना ही नेत्याचा स्वाभिमान असते. यापूर्वी सूरज चव्हाण यांच्या बाबतीत घडलेली घटना पुन्हा होणार नाही, याची दक्षता घेऊन संघटन मजबूत केले जाईल."




