'राजसाहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे'; अमित ठाकरेंची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना

'राजसाहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे'; अमित ठाकरेंची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना

 पुणे: गणेशोत्सवानिमित्त पुण्यात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. पुण्याचे लाडके दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. यंदा मंडळाच्या वतीने वृंदावन येथील प्रसिद्ध 'प्रेम मंदिरा'ची १३५ फूट उंच अशी भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून आकर्षक रोषणाईने हा देखावा उजळून निघाला आहे. मुख्य मंदिराबाहेर दर्शनासाठी सुमारे ५०० मीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान विविध गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. डोक्यावर पारंपरिक फेटा बांधून ते दगडूशेठ गणपतीच्या चरणी नतमस्तक झाले.

 

राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी साकडं
बाप्पाच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, "मी फक्त मंदिरात येऊनच नाही, तर ३६५ दिवस देवाकडे प्रार्थना करत असतो. पण केवळ प्रार्थना करण्यापेक्षा स्वतः मैदानात उतरून लोकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे मला अधिक महत्त्वाचे वाटते." यावेळी राज ठाकरेंसाठी काय मागणे मागितले, असे विचारले असता, "राज साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे," अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

 

पारंपरिक वाद्यांना पसंती आणि चाहत्यांचा उत्साह
 जुन्या काळात जसा गणेशोत्सव साजरा व्हायचा, तसाच पुन्हा मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय, असा आनंद त्यांनी व्यक्त केला. तसेच डीजे ऐवजी ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांचीच आपल्याला अधिक आवड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 दर्शनादरम्यान तरुण आणि भाविकांनी अमित ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या उदंड प्रतिसादावर बोलताना, "हे लोकांचे प्रेम आहे आणि मी खूप नशीबवान आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.