‘जंगल शांत आहे म्हणजे सिंह नाही असं समजू नका’; शिवेंद्रसिंहराजेंचा शशिकांत शिंदेंना नाव न घेता इशारा

‘जंगल शांत आहे म्हणजे सिंह नाही असं समजू नका’; शिवेंद्रसिंहराजेंचा शशिकांत शिंदेंना नाव न घेता इशारा

सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. बँकेच्या ठरावांवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यातील संघर्ष आता पुन्हा चर्चेत आला आहे.

 जावळी तालुक्यातील दहीहंडी उत्सवादरम्यान शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना नाव न घेता थेट इशारा दिला. ‘जंगल खामोश है, इसका मतलब ये मत समझो की जंगल में शेर नहीं है,’ असं म्हणत त्यांनी आपल्या हितचिंतकांना आणि विरोधकांना उगाच डिवचू नका, असा इशारा दिला. ‘काड्या घालण्याचं काम करू नका, ते तुम्हाला परवडणार नाही,’ असंही शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शशिकांत शिंदेंच्या दिशेने असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 सातारा-जावळी मतदारसंघातील दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष जुना आहे. स्थानिक संस्था आणि सहकारी संस्थांमधील वर्चस्वावरून दोन्ही गटांमध्ये अनेकदा राजकीय चुरस पाहायला मिळते. त्यातच आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या या इशाऱ्यानंतर शशिकांत शिंदे काय उत्तर देणार, याकडे आता सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.