मोदी-शाहांचा आदेश आला तर फडणवीस पुढचे शिक्षणमंत्री? संजय राऊतांचा दावा

मोदी-शाहांचा आदेश आला तर फडणवीस पुढचे शिक्षणमंत्री? संजय राऊतांचा दावा

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील भूमिकेबाबत मोठा दावा केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस कितीही महाराष्ट्रात राहण्याची इच्छा व्यक्त करत असले तरी अंतिम निर्णय मोदी-शाहांचाच असेल. आदेश आला तर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून दिल्लीला जावंच लागेल."

राऊत यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरही टीका करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाखाली शिक्षणपद्धती गेल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवण्यासाठी संघाबाहेरील व्यक्तीला संधी द्यायला हवी. त्यांनी नंदन निलेकणी यांचे नाव सुचवत, "जर फडणवीसांचा विचार होत असेल तर तेही या पदासाठी सक्षम आहेत," असे मत व्यक्त केले.

याशिवाय, राऊत यांनी भाजप सरकारवर गेल्या दहा वर्षांत शिक्षण व्यवस्था मागे नेल्याचा आरोप करत नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या काळातील आधुनिक शिक्षण धोरणाचे कौतुक केले. तसेच, आयआयटी आणि आयआयएमसारख्या संस्थांच्या स्थापनेचा उल्लेख करत सध्याच्या शिक्षण धोरणावरही त्यांनी निशाणा साधला.संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे.