गौतम गंभीरने परदेशात पहिल्यांदाच मालिका जिंकली, पण WTCचं गणित बिघडलं! टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहोचणार?
मुंबई (प्रतिनिधी) : भारताने श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली असली, तरी कोलंबो कसोटी अनिर्णित राहिल्याने टीम इंडियाच्या आनंदावर काहीसं विरजण पडलं आहे. विशेष म्हणजे, भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतरही सामना जिंकता आला नाही. सोनल दिनुशाच्या ऐतिहासिक शतकामुळे श्रीलंकेने भारताला विजयापासून रोखत दुसरी कसोटी अनिर्णित राखली.

या कसोटीत भारताने विजय मिळवला असता, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताला तब्बल 12 गुण मिळाले असते. त्याचबरोबर भारताची पॉइंट्स पर्सेंटेज 63.33 पर्यंत पोहोचली असती आणि संघाने चौथ्या स्थानावर झेप घेतली असती. मात्र, सामना ड्रॉ झाल्यामुळे भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण मिळाले. या निकालानंतर भारताची पॉइंट्स पर्सेंटेज 53.33 वरून घसरून 51.51 झाली आहे. गुणतालिकेतील भारताचं पाचवं स्थान मात्र कायम आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया सध्या पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत मोठा विजय मिळवला. त्यामुळे त्यांची पॉइंट्स पर्सेंटेज 80 पर्यंत पोहोचली असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. गतविजेता दक्षिण आफ्रिका 75 पॉइंट्स पर्सेंटेजसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2021 च्या पहिल्या WTC फायनलचे विजेते न्यूझीलंड सध्या तिसऱ्या स्थानावर आहेत, तर बांगलादेश त्यांच्यानंतर आहे. भारत 51.51 पॉइंट्स पर्सेंटेजसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये भारतासाठी प्रत्येक विजयाचं महत्त्व आणखी वाढलं आहे.
श्रीलंका दौरा संपल्यानंतर भारत आता व्हाइट-बॉल क्रिकेटकडे वळणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरच्या मध्यात न्यूझीलंड दौऱ्यावर भारताची पुढील कसोटी मालिका होणार आहे. सध्याच्या सायकलमध्ये भारताचे अजून 7 कसोटी सामने शिल्लक आहेत. त्यापैकी 2 कसोटी न्यूझीलंडविरुद्ध आणि 5 कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळल्या जाणार आहेत.
याचा अर्थ असा की, WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी या 7 पैकी तब्बल 6 सामने जिंकणे भारतासाठी जवळपास अनिवार्य ठरणार आहे. म्हणजेच एका सामन्यात पराभव झाला किंवा एक सामना अनिर्णित राहिला, तरी भारताचं फायनलचं गणित आणखी कठीण होऊ शकतं.
या मालिकेतील 1-0 असा विजय हा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कारकिर्दीतील पहिला परदेशी कसोटी मालिका विजय ठरला. गॉल कसोटीत भारताने श्रीलंकेवर 165 धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती. कोलंबोमध्येही भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखलं.
भारताने 503/9 अशी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर श्रीलंकेला 290 धावांत गुंडाळत फॉलोऑन दिला. त्यामुळे भारत क्लीन स्वीपच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र होतं. मात्र, सोनल दिनुशाने संपूर्ण समीकरणच बदलून टाकलं. त्याच्या नाबाद 133 धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने भारताचा विजय हिरावून घेतला आणि सामना अनिर्णित राखला.




