देश काय तुमच्या बापाची जहागीर वाटली काय? रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर पलटवार
मुंबई (प्रतिनिधी) : नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता दिल्लीसह संपूर्ण देशभरात पसरली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला ३१ दिवस पूर्ण झाले आहेत. आज आंदोलकांनी थेट संसदेवर धडक देण्याचा प्रयत्न केल्याने संसद परिसरात एकच गोंधळ उडाला आणि सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आल्या. या घटनेचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटू लागले असून, भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आंदोलकांवर केलेल्या टीकेला, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.संसदेसमोरील आंदोलनावर टीका करताना अतुल भातखळकर म्हणाले होते,"हे आंदोलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काय बापाचा माल आहे का? देशातील कोट्यवधी जनतेने मतदान करून नरेंद्र मोदी यांना सत्तेवर बसवलं आहे. ते कोणाच्या कृपेने सत्तेवर आलेले नाहीत. जनतेने त्यांना निवडून दिलं आहे."
भातखळकरांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेत रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून त्यांच्यावर थेट हल्लाबोल केला. रोहिणी खडसे म्हणाल्या,"अरे मोदीजींच्या चमच्या, पंतप्रधानांचा राजीनामा मागणे हा बापाचा माल नाही, तर देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जहागीर वाटली काय?
देशातील कोट्यवधी जनतेने देशाला देशोधडीला लावण्यासाठी तुम्हाला सत्ता दिलेली नव्हती.जी जनता तुम्हाला डोक्यावर उचलून घेऊ शकते, तीच जनता वेळ आल्यास तुम्हाला उचलून आपटूही शकते!देशातील जनतेला, विशेषतः तरुणांना गृहीत धरण्याची चूक करू नका, अशा कडक शब्दांत खडसेंनी इशारा दिला.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या पोलीस लाठीमारचा निषेध करत रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या,"लोकशाहीत प्रश्न विचारणे आणि शांततेत आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार लाठीच्या जोरावर चिरडणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. आज तरुणांच्या हातात रोजगार आणि शिक्षण देण्याऐवजी सरकार त्यांच्या अंगावर जखमा देत आहे. हा लोकशाहीचा नव्हे, तर दडपशाहीचा मार्ग आहे. सरकारने तातडीने आंदोलकांशी संवाद साधून सकारात्मक निर्णय घ्यावा."




