450 कोटींचा आदिनाथ कारखाना 120 कोटींना विकणार? भाजपच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप

450 कोटींचा आदिनाथ कारखाना 120 कोटींना विकणार? भाजपच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित लिलावावरून राजकारण तापलं आहे. सुमारे 450 कोटी रुपयांचा कारखाना अवघ्या 120 कोटी रुपयांत विकण्याच्या हालचाली सुरू असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार आणि कारखान्याचे अध्यक्ष नारायण आबा पाटील यांनी केला आहे.

अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्याची मोक्याची जागा आणि मालमत्ता यामुळे अनेकांचे लक्ष त्याकडे लागले आहे. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाकडे मदत मागितली असताना, काही 'अदृश्य शक्तींनी' लिलावाची प्रक्रिया पुढे रेटल्याचा आरोपही नारायण पाटील यांनी केला.

तसेच, हा कारखाना ओंकार शुगरचे बाबुराव बोत्रे यांना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, या सर्वामागे कोण आहे, याबाबत त्यांनी थेट नाव न घेता गंभीर संकेत दिले.दरम्यान, ही 'अदृश्य शक्ती' म्हणजे भाजप नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, तो प्रश्न त्यांनाच जाऊन विचारा, असं उत्तर नारायण पाटील यांनी दिलं.

यावेळी त्यांनी इशारा देत म्हटलं, लिलावात हा कारखाना कोणीही घेतला, तरी करमाळ्याची जनता आणि 32 हजार सभासद त्याला कारखान्यात पाऊल ठेवू देणार नाहीत. आम्ही या विक्रीला ठाम विरोध करणार आहोत.

दरम्यान, कारखान्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, त्यातून अपेक्षित निधी मिळाला नाही. आता या आरोपांवर भाजप नेते राम शिंदे काय भूमिका घेतात आणि राज्य सरकार याबाबत कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.