ठाण्यात तरुणीवर चुलत भावांकडून अत्याचाराचा आरोप; दोन आरोपी अटकेत
ठाणे प्रतिनिधी - ठाण्यात 19 वर्षीय चुलत बहिणीवर चुलत भावांकडून गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीवर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिला मारण्याची धमकी देण्यात आल्याने पीडित तरुणी अनेक महिने गप्प राहिली.

मात्र अखेर धाडस करून तरुणीने आपल्या आईला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे सुरुवातीला कोपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिसऱ्या अल्पवयीन आरोपीला भिवंडी बाल न्यायालयात पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रकरणातील आरोपांची आणि घटनाक्रमाची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.




