योगेश कदमांचा तटकरेंना थेट इशारा; मी बोललो तर अनेकांचं पितळ उघडं पडेल, तडजोडीचा प्रश्नच नाही

योगेश कदमांचा तटकरेंना थेट इशारा; मी बोललो तर अनेकांचं पितळ उघडं पडेल, तडजोडीचा प्रश्नच नाही

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणातील महायुतीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील वाद आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. रामदास कदम आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक संघर्षात आता मंत्री योगेश कदम यांनीही उडी घेत तटकरेंना थेट इशारा दिला आहे.

सुनील तटकरे यांच्या वक्तव्यानंतर तडजोडीची कोणतीही शक्यता उरलेली नसल्याचे योगेश कदम यांनी स्पष्ट केले. "मी त्यांच्या विरोधात खूप काही बोलू शकतो. पण सध्या खोलात जायचं नाही. मात्र, मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेमकं कोणी कोणाला मदत केली, हे बाहेर आलं तर अनेकांचं पितळ उघडं पडेल," असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याआधी रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना तटकरेंनीही कदमांवर वैयक्तिक पातळीवर टीका करत जोरदार पलटवार केला होता.

दोन्ही नेत्यांकडून झालेल्या या परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. आता हा वाद आणखी वाढणार की वरिष्ठ नेते यात हस्तक्षेप करून तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.