विनोद तावडेंकडे राष्ट्रीय सरचिटणीसपद कायम; स्मृती इराणींनाही मोठी जबाबदारी, भाजपची नवी टीम

विनोद तावडेंकडे राष्ट्रीय सरचिटणीसपद कायम; स्मृती इराणींनाही मोठी जबाबदारी, भाजपची नवी टीम

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने आपली नवी राष्ट्रीय टीम जाहीर केली आहे. यामध्ये खासदार विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणापासून काहीशा दूर असलेल्या स्मृती इराणी यांनाही पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनाही पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाची बहुप्रतिक्षित नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नव्या टीममध्ये आगामी विधानसभा निवडणुका आणि प्रादेशिक समतोल लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. युवा आणि महिला नेतृत्वाला विशेष स्थान देतानाच जातीय समीकरणांचाही विचार करण्यात आला आहे. या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील नेत्यांनाही महत्त्वाची पदं देण्यात आली आहेत.

भाजपच्या नव्या कार्यकारिणीत 13 उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय महामंत्री आणि 16 राष्ट्रीय मंत्री यांचा समावेश आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील तब्बल 8 नेत्यांना संधी देण्यात आली आहे. सोशल मीडिया संयोजक अमित मालवीय यांना मात्र या नव्या टीममधून वगळण्यात आलं असून त्यांच्या जागी दीपक मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील अनेक प्रमुख नेत्यांना नव्या टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे भाजपच्या संघटनात्मक बांधणीला आणखी बळकटी मिळेल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात येत आहे.