‘गद्दारांचा मेळा’; श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकळा, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ, पण संसदेत जायला वेळ नाही; संजय राऊतांचा घणाघात
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पक्ष आणि चिन्ह, तसेच आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात घमासान सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे सरकार पाडण्यात आलं आणि पक्ष बळकावण्यात आला, या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद करत आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गट अडचणीत आला आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

याचदरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदारही पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पोहोचले. मात्र, यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून संसदेत कामकाज सुरू असताना पंतप्रधान मोदी संसदेत फिरकत नसल्याचा संदर्भ देत संजय राऊत यांनी ‘श्रीमान मोदी’ म्हणत त्यांच्यावर घणाघाती प्रहार केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत हा ‘गद्दारांचा मेळा’ असल्याचं म्हटलं आहे.
गद्दार खासदारांना फाफडा, ढोकळा आणि जिलेबीची पार्टी द्यायला वेळ आहे, मात्र संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. हा जनतेचा अपमान आणि संविधानाचा अपमान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, याच संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचंही संजय राऊत यांनी ट्विटमधून सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवरून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. सलग दोन सुनावण्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी विधिमंडळ पक्षालाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यासोबतच निवडणूक आयोगाच्या नैतिकतेवर आणि कायदेशीर मर्यादांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा संदर्भ देतानाच केरळ काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचाही दाखला दिला.
या प्रकरणात आता शिवसेना शिंदे गटाकडूनही प्रतिवाद केला जाणार आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करून शिवसेनेचं चिन्ह गोठवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.याबाबत ठाकरे गटाकडूनही सूचक वक्तव्यं करण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




