ऑपरेशन टायगर’ यशस्वी? ठाकरे गटातील 6 खासदारांबाबत मोठी माहिती समोर

ऑपरेशन टायगर’ यशस्वी? ठाकरे गटातील 6 खासदारांबाबत मोठी माहिती समोर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या काळात 40 आमदारांसह ऐतिहासिक बंड घडवून आणणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ठाकरे गटातील खासदारांना आपल्या बाजूला वळवण्यात यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे 6 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, सध्या कोणतीही अधिकृत घोषणा न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. ठाकरे गटाकडून होणाऱ्या संभाव्य कायदेशीर हालचालींचा अभ्यास करूनच पुढील पावले उचलली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी सर्व सहा खासदारांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद साधला. जवळपास 30 मिनिटे चाललेल्या या चर्चेत काही संभ्रमात असलेले खासदारही सहभागी झाल्याचे सांगितले जाते. यावेळी शिंदे यांनी सर्व खासदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.या घडामोडींमुळे ठाकरे गटातील काही खासदार संसदीय बोर्डाच्या बैठकीपासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, या संपूर्ण घडामोडी अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडाव्यात यासाठी खास जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, संभाव्य नाराज खासदारांची मनधरणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे. संबंधित खासदारांशी सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न होत असून पक्ष नेतृत्वालाही प्रत्येक घडामोडीची माहिती दिली जात असल्याचे समजते.या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.