गणेश नाईकांच्या नादाला लागलात तर जागा दाखवेन ; वनमंत्री गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

गणेश नाईकांच्या नादाला लागलात तर जागा दाखवेन ; वनमंत्री गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

मुंबई : नवी मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि युडीसीपीआर (UDCPR) नियमांवरून वनमंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. "गणेश नाईकच्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही," असा थेट आणि गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. नाईक यांनी जाहीरपणे कोणाचेही नाव घेतले नसले, तरी त्यांचा हा थेट रोख नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

"अतिधोकादायक नसलेल्या इमारतींवर क्लस्टरचे फॅड"

नवी मुंबईतील क्लस्टर योजनेविरोधात गणेश नाईक यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "क्लस्टरच्या माध्यमातून ओढून-ताणून, ३० वर्षे पूर्ण न झालेल्या आणि पडझड किंवा अतिधोकादायक नसलेल्या इमारतींमध्येही 'क्लस्टर डेव्हलपमेंट'चे फॅड उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे," असा आरोप नाईक यांनी केला.

तसेच, "युडीसीपीआर कुठल्या शहाण्याने आणला?" असा सवाल विधानसभेत उपस्थित केल्याची आठवण करून देत, "नवी मुंबईतील सर्व इमारतींचा एफएसआय (FSI) नव्या नियमांनुसार वाढवला, तर नवी मुंबईत भविष्यात जगण्यासारखे काहीही राहणार नाही," अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर विधान

शिवसेना (ठाकरे गट) मधील ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आणि केंद्रातील आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील नेत्यांची नावे चर्चेत असतानाच गणेश नाईकांनी हा थेट इशारा दिला आहे. राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्याकडून 'ऑपरेशन टायगर' राबवले जात असताना आणि अनेक आमदार-खासदार त्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान महायुतीतीलच ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक यांनी जाहीरपणे ही भूमिका मांडल्याने महायुतीत नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता गणेश नाईक यांच्या या आव्हानावर आणि इशाऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.