कोल्हापूर जिल्हा परिषदेत 'सेवा संकल्प अभियानाला' उत्साहात सुरुवात

कोल्हापूर जिल्हा परिषदेत 'सेवा संकल्प अभियानाला' उत्साहात सुरुवात

कोल्हापूर (प्रतिनिधी): देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक,संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ९ सप्टेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार, १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे अभियान राबवले जाणार आहे.

या अभियानाचा शुभारंभ आज, गुरुवारी (१७ सप्टेंबर) जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत सर्व पंचायत समिती कार्यालये व त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला.

अभियानाच्या पहिल्याच दिवशी सर्व पंचायत समित्यांमध्ये शासन निर्णयाचे वाचन, वृक्षारोपण, स्वच्छता शिबिर, आरोग्य तपासणी आणि लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप असे उपक्रम पार पडले.

कसबा सांगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

अभियानांतर्गत गुरुवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती कागल अंतर्गत कसबा सांगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या भेटीदरम्यान आरोग्य केंद्रात महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच परिसर स्वच्छता व वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘सेवा संकल्प अभियाना’ची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  संतोष जोशी,सभापती  सुवर्णा पाटील ,गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, पंचायत समिती सदस्य, तेजस्विनी भोरे,अनिलकुमार हेगडे, सरपंच कसाब सांगाव विरश्री जाधव, तालुका आरोग्य अधिकारी सौरभ शिंदे  आदी उपस्थित होते.

 

महिनाभर चालणाऱ्या या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.