जि. प. स्थायी समिती सभेत आरोग्य, पाणीपुरवठा, इमारतींच्या मुद्द्यांवर चर्चा
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभेत आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, शासकीय इमारतींचा जागा प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थानी अध्यक्षा शिल्पाताई खोत होत्या.

सभेत उपस्थित झालेले प्रमुख मुद्दे व निर्णय:
गणेशा आरोग्याचा' अभियानाचा प्रारंभ:
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संकल्पनेतून 'श्री गणेशा आरोग्याचा' या नवीन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
लाभार्थ्यांच्या वस्तूंची चाचपणी:
गेल्या ५ वर्षांत वैयक्तिक लाभाच्या योजनांतून दिलेल्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष चाचपणी करण्यात यावी, अशी मागणी सदस्य अमरसिंग पाटील यांनी केली.
करवीर पंचायत समितीची जागा:
करवीर पंचायत समिती इमारतीसाठी कागलकर हाऊस जवळील जागा न देता शेंडापार्क येथील जागा देण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण मुद्दा सदस्य अमरसिंग भाऊ पाटील आणि सदस्य संग्रामसिंग कुपेकर यांनी लावून धरला.
आरोग्य केंद्रांतील औषध तुटवडा:
आजरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पाहणी केली असता तेथे औषधे आणि इतर अनुषंगिक साहित्याचा तुटवडा जाणवत आहे; याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्वरित अहवाल सादर करावा, असे निर्देश सदस्य सुधीर देसाई यांनी दिले.
हातकणंगले पाणीपुरवठा कामे:
हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कामे डिसेंबर अखेर पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सर्व कामे एकाच ठेकेदाराकडे असल्याने ती अपूर्ण आहेत, यावर तातडीने उपाययोजना करावी, असा मुद्दा सदस्य शिवाजी जाधव यांनी मांडला.
भाउसिंगजी रोडवरील प्रस्तावित इमारत:
भाउसिंगजी रोडवरील प्रस्तावित इमारतीचा नकाशा तयार करण्यात आला असून, इमारत बांधकामासाठी बी.ओ.टी. (BOT), कर्ज सुविधा, डिपॉझिट किंवा स्वनिधी हे पर्याय चर्चेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात येत असल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील यांनी सांगितले.
या सभेस उपाध्यक्ष तानाजी पाटील, शिक्षण व अर्थ समिती सभापती शितल यादव, समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या पाटील यांच्यासह सदस्य संग्रामसिंग कुपेकर, सुधीर देसाई, अमरसिंग भाऊ पाटील, जयंत पाटील आणि शिवाजी जाधव तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सामान्य प्रशासन अधिकारी ओमप्रकाश यादव, वित्त अधिकारी अतुल आकुर्डे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




