दोन-दोन उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे, मग ओबीसींवर अन्याय का? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल
मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी मंडल यात्रेच्या निमित्ताने भंडाऱ्यात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला. या कार्यक्रमात काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महायुती सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

वडेट्टीवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ओबीसींच्या पाठिंब्यावर सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री स्वतःला ओबीसी समाजाचा असल्याचे सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर ओबीसी समाजासाठी ठोस भूमिका घेतली असती, तर ओबीसी जनगणना पहिल्याच टप्प्यात जाहीर केली असती.
ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सरकारला सवाल केला. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कलम ठेवले नाही आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात ठेवू असे सांगितले जात आहे. मग पहिल्या टप्प्यातच का समावेश केला नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, दोन-दोन उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत म्हणून ओबीसींवर अन्याय केला जातो का? एखादा ओबीसी समाजाचा उपमुख्यमंत्री असता तर ओबीसींचे प्रश्न सरकारमध्ये कोण मांडणार नाही का? असा सवाल त्यांनी केला.
ओबीसी समाजाच्या निधीवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ओबीसी महामंडळाला केवळ 500 कोटी रुपये दिले जातात, तर इतर महामंडळांसाठी मोठा निधी दिला जातो. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध नाही. आमच्या समाजालाही समान न्याय मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
ओबीसींची लोकसंख्या लक्षात घेऊन निधी आणि सुविधा द्याव्यात, महाज्योतीसाठी 1 हजार कोटींचा निधी द्यावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. तसेच, ओबीसींच्या हक्कासाठी सुरू झालेली ही लढाई शेवटपर्यंत नेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.




