राज ठाकरेंनी इतरांवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कामाचा हिशोब द्यावा; अमित साटम यांचा पलटवार

राज ठाकरेंनी इतरांवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कामाचा हिशोब द्यावा; अमित साटम यांचा पलटवार

मुंबई (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूचे फूटप्रिंट तपासण्याची केलेली टिप्पणी भाजपने जोरदारपणे फेटाळली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी प्रत्युत्तर देताना, राज ठाकरे यांच्या पक्षाकडे एकही आमदार किंवा खासदार नाही, तर मुंबई महापालिकेत केवळ सहा नगरसेवक आहेत. त्यामुळे फूटप्रिंट काढायची गरज असेल, तर आधी त्यांच्याच मेंदूचे काढावेत, असा टोला लगावला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना साटम म्हणाले, राज ठाकरे आरोप करतात, भाषणं करतात, यात काही नवीन नाही. ते आता स्टँडअप कॉमेडियनसारखे वागत आहेत. शिवउद्योगच्या माध्यमातून किती मराठी तरुणांना रोजगार दिला, याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे.

यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचाही उल्लेख केला. स्किल डेव्हलपमेंट, एमएसएमई आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजनांमुळे लाखो युवकांना संधी मिळाली आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. अशा मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी राज ठाकरे फक्त टीका करत आहेत, असे साटम म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधताना अमित साटम म्हणाले, मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षातील बहुतांश आमदारांनी त्यांची साथ सोडली. पक्ष आणि चिन्हही गेले. आता रोज टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा विषय उरलेला नाही. मुंबई महापालिकेत सत्ता असताना मुंबईकरांसाठी केलेले एखादे ठोस काम त्यांनी दाखवावे.

शेवटी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख करत साटम म्हणाले, हे नेते मुद्द्यांवर बोलत नाहीत. तपशीलाऐवजी मिश्किल टीका करण्यातच त्यांचा वेळ जात आहे.