अमित शाहांनी सांगितला अजित डोवाल यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा; मोदींनी दिलेल्या महत्त्वाच्या सल्ल्याचाही केला उल्लेख
मुंबई (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टने यंदाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' अजित डोवाल यांना जाहीर केला, याचा मला मनापासून आनंद आहे. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मी ट्रस्टचे आभार मानतो,अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्याचं तोंडभरून कौतुक करत त्यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सल्ल्याचा उल्लेख केला.

पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (लोकमान्य टिळक स्वराज्य संघ) यांच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल मैदानावर आयोजित या सोहळ्यात अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भाषणात अमित शाह म्हणाले, पुरस्कार हा केवळ सन्मान नसतो, तर तो अधिक मोठं कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा असतो. एखादी व्यक्ती समाजासाठी मोठं योगदान देते, तेव्हा समाजाने तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. अजित डोवाल यांना हा पुरस्कार मिळत असल्याचा मला विशेष आनंद आहे.
ते पुढे म्हणाले, मी गुजरातचा गृहमंत्री असतानापासून अजित डोवाल यांना ओळखतो. गुजरातमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. मोदीजींनी मला सांगितलं होतं की, हा फक्त एक बॉम्बस्फोट नसून त्यामागे मोठं षडयंत्र आहे. केवळ या घटनेचा नव्हे, तर देशभरातील अशा साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनांचा अभ्यास गुजरात पोलिसांनी करावा. त्यासाठी अजित डोवाल यांच्यासोबत समन्वय साधून काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता.
अमित शाह यांनी पुढे पहिल्या भेटीचा किस्साही सांगितला. आजही आठवतं, अजित डोवाल दुपारच्या वेळी माझ्या घरी आले होते. त्यांनी दिलेली माहिती आणि मार्गदर्शन पुढे इतकं प्रभावी ठरलं की, केवळ अहमदाबादच नव्हे तर देशभरातील १३ ठिकाणच्या बॉम्बस्फोटांच्या घटनांचा उलगडा गुजरात पोलिसांना करता आला. ही त्यांच्या दूरदृष्टीची आणि कौशल्याची मोठी देणगी होती, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
भाषणाच्या सुरुवातीला अमित शाह यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत स्वराज्याची स्थापना केली, तर लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याची ज्योत प्रज्वलित केली. ते कर्मयोगी, निर्भीड पत्रकार आणि महान स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचं योगदान अतुलनीय असून, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असेही अमित शाह यांनी नमूद केले.




