सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून रुग्णालयात हलवलं; राहुल गांधींची सरकारवर टीका
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत असलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी पहाटे सफदरजंग रुग्णालयात हलवलं. पोलिसांनी सांगितलं की, वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याने, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत ही कारवाई करण्यात आली.

वांगचुक यांना हलवताना परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही व्हिडिओंमध्ये त्यांच्याभोवती चादर धरून त्यांना हलवल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली, तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही समोर आलं आहे.
या घटनेनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना अशा पद्धतीने हटवणं चुकीचं असून, विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न मांडण्याचा अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही.
दरम्यान, सफदरजंग रुग्णालयाच्या माहितीनुसार, दीर्घकाळ उपोषण आणि निर्जलीकरणामुळे सोनम वांगचुक अशक्त झाले आहेत. सध्या ते शुद्धीवर असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.




