रायगडच्या पालकमंत्रीपदावर आदिती तटकरेंची मोठी भूमिका; 'भरत गोगावले झाले तरी हरकत नाही'

रायगडच्या पालकमंत्रीपदावर आदिती तटकरेंची मोठी भूमिका; 'भरत गोगावले झाले तरी हरकत नाही'

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना आता नवं वळण मिळालं आहे. या पदासाठी मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांची नावे चर्चेत असतानाच, आदिती तटकरेंनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या,"रायगडच्या पालकमंत्रीपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली तरी त्यांना माझ्याकडून शुभेच्छाच असतील. आमच्यासाठी पदापेक्षा जिल्ह्याचा विकास अधिक महत्त्वाचा आहे. रायगडला दोन मंत्री लाभले आहेत, त्यामुळे दोघांनीही एकत्रितपणे जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणं गरजेचं आहे."

याचवेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिला वगळल्याच्या आरोपांवरही स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या मते, अनेक अर्जांमध्ये कागदपत्रे आणि ई-केवायसीमध्ये तफावत आढळली आहे. तसेच, अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न किंवा वाहनधारक असलेल्या महिलांना नियमानुसार वगळण्यात आलं आहे.

तटकरे यांनी स्पष्ट केलं की,पात्र महिलांना कोणत्याही परिस्थितीत वंचित ठेवण्याचा सरकारचा हेतू नाही. ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून, लाडकी बहीण आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.