देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेसमुळे नाही; नरेंद्र मोदींमुळेच होईल, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
मुंबई (प्रतिनिधी) : आगामी काळात देशात सत्ताबदल नक्की होणार आहे. मात्र, हा बदल आमच्यामुळे किंवा काँग्रेस अथवा कोणत्याही राजकीय पक्षामुळे होणार नाही. तर हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच होईल. त्यांच्या गेल्या 12 वर्षांतील कारभारामुळे हा बदल घडेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते शुक्रवारी नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.2029 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे आता चेहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

केंद्रात सत्ताबदल कधी होईल तेव्हा होईल. मात्र, मोदी सरकारच्या उर्वरित काळात देशाचा पुढचा पूर्णवेळ शिक्षणमंत्री कोण असणार, हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे आधीच तीन महत्त्वाची खाती आहेत आणि आता त्यात या नवीन जबाबदारीची भर पडली आहे.
शिक्षण खाते हे पूर्णवेळ मंत्र्याची गरज असलेले खाते आहे, पार्टटाईम खाते नाही. त्यामुळे लवकरच मोदी सरकार देशाला चांगला शिक्षणमंत्री देईल, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणारा, परीक्षाव्यवस्थेतील गोंधळ कमी करू शकणारा आणि मूलभूत शिक्षणाचे प्रश्न माहिती असणारा शिक्षणमंत्री देशाला गरजेचा आहे. मात्र, सध्याच्या मोदी सरकारमध्ये अशी एकही व्यक्ती नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बढती मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, फडणवीस शिक्षणमंत्री झाले तर आम्हाला ते चालणार नाही. आम्ही त्याला विरोध करू. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी झाली आहे. त्यामुळे फडणवीस शिक्षणमंत्रीपदासाठी उपयुक्त नाहीत, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
दरम्यान, नाशिकच्या रस्ते आणि पायाभूत सुविधांवरही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “मी पहिल्यांदा समृद्धी महामार्गाने आलो. वाटलं लवकर पोहोचेन. मात्र, समृद्धी महामार्गावर नाशिकमध्ये येण्यासाठी कोणत्याही पाट्या लावलेल्या नाहीत. त्यामुळे आमचा रस्ता चुकला आणि बराच वेळ फिरावे लागले.”
नाशिकसारख्या आधुनिक शहरात अशा सुविधा असल्या पाहिजेत. आज नाशिकमध्ये येताना खड्ड्यांचाही अनुभव घेतला. आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये सहा कोटी लोक आले, तर एवढा भार शहराला झेपेल का, याचा विचार कोणी केलेला नाही. फक्त पैसे खाण्याचा हा विषय आहे, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.




