श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या वतीने NEET मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा महामहिम कार्लिटो नुन्स यांच्या हस्ते गौरव
इचलकरंजी (प्रतिनिधी) श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट, संस्थेच्या वतीने NEET 2026 मध्ये 525 हून अधिक गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, तिमोर-लेस्टेचे भारतातील राजदूत महामहिम कार्लिटो नुन्स यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांचे शैक्षणिक सल्लागार अनुज गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती.सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने घेतलेली भरारी पाहून महामहिम कार्लिटो नुन्स भावूक झाले. विद्यार्थ्यांचे यश आणि पालकांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू यांनी त्यांना विशेष भावले. श्रद्धा इन्स्टिट्यूटकडून करण्यात आलेल्या आदरातिथ्याबद्दलही त्यांनी कौतुक व्यक्त केले. महाराष्ट्रात आणि विशेषतः श्रद्धा इन्स्टिट्यूटमध्ये उपस्थित राहता आल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना कार्लिटो नुन्स म्हणाले, “तिमोर-लेस्टे हा जगातील सुंदर, सुरक्षित आणि शांतताप्रिय देशांपैकी एक आहे. भारत आणि तिमोर-लेस्टे हे वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य व भागीदारीसाठी कटिबद्ध आहेत.” भारतीय विद्यार्थ्यांसाठी MBBS शिक्षणाचा तिमोर-लेस्टे हा उदयोन्मुख पर्याय असल्याचे सांगत त्यांनी तेथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भारतीय शिक्षक, भारतीय पुस्तके आणि भारतीय भोजन यांसारख्या सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले तिमोर-लेस्टेमध्ये वैद्यकीय पदवी मिळविण्यासाठी स्थानिक भाषेत परीक्षा देण्याची आवश्यकता नसल्याचे वैशिष्ट्यही त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा उपयोग केवळ स्वतःच्या भविष्यासाठी न करता कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक सल्लागार अनुज गोयल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संपूर्ण भारतभर प्रवास केला असला तरी इचलकरंजीतील श्रद्धा इन्स्टिट्यूटने दिलेले प्रेम, आपुलकी आणि आदरातिथ्य कधीही विसरणार नसल्याचे सांगितले. “या यशामुळे हुरळून जाऊ नका. हे यश तुमच्या करिअरच्या नव्या प्रवासाची सुरुवात समजा,” असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. वैद्यकीय व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत, “डॉक्टर रुग्णाला केवळ औषध देत नाही, तर त्याला आशा आणि विश्वासही देतो,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रद्धा इन्स्टिट्यूटचे संचालक अभिषेक तांबे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. श्रद्धा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष ए. आर. ताबे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तिमोर-लेस्टेसारख्या छोट्या देशाने वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी श्रद्धा इन्स्टिट्यूट आणि तिमोर-लेस्टे यांच्यातील सहकार्य अधिक दृढ व दीर्घकाळ टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया कौंदाडे यांनी केले. यावेळी श्रद्धा इन्स्टिट्यूटचे समन्वयक एम. एस. पाटील, सगीता पवार, सी. सृष्टी ताबे, बिप्लब पॉल, राहुल खोत,सत्यनारायणन, नागेंद्र, दुर्गा यांच्यासह संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, तिमोर-लेस्टेचे राजदूत कार्लिटो नुन्स यांनी आपल्या दौऱ्यात रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूलला सदिच्छा भेट देऊन तेथील शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली.




