१९ वर्षे गुणवत्तेतील सातत्यामुळे अशोकराव माने पॉलिटेक्निक तांत्रिक शिक्षणात आघाडीवर - मनीषा माने
वडगाव (प्रतिनिधी) : अशोकराव माने पॉलिटेक्निकच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध शैक्षणिक व तांत्रिक उपक्रमांचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका मनिषा विजयसिंह माने यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.यावेळी ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागांसाठी उभारण्यात आलेल्या अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या नव्या अत्याधुनिक वेबसाईटचे लॉन्चिंग करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या स्मार्ट बस ट्रॅकिंग सिस्टीमचेही अनावरण करण्यात आले. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना मिळणार असून उद्योगाभिमुख शिक्षणाची दिशा अधिक बळकट होणार आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना संचालिका मनिषा विजयसिंह माने यांनी सांगितले की, अशोकराव माने पॉलिटेक्निकने गेल्या १९ वर्षांत सातत्याने शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यांचा उत्कृष्ट समन्वय साधला आहे. त्यामुळेच येथील हजारो विद्यार्थी आज देश-विदेशातील नामांकित उद्योग, संस्था व विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत असून राष्ट्रसेवेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था भविष्यातही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत राहील.
प्राचार्य डॉ. युवराज गुरव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कॉम्प्युटर व एआय-एमएल विभागांबरोबरच ऑटोमोबाईल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसारख्या कोअर अभियांत्रिकी शाखांसाठीही अत्याधुनिक संगणक अभियांत्रिकी प्रयोगशाळा उभारणारे अशोकराव माने पॉलिटेक्निक हे राज्यातील मोजक्या आणि अग्रगण्य तंत्रनिकेतनांपैकी एक आहे. उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी पॉलिटेक्निक सातत्याने प्रयत्नशील आहे.
या कार्यक्रमास डॉ. सुहास लकडे, प्रा. पी. टी. हसबे, डॉ. भरत घाटगे, प्रा. निखिल पाटील,प्रा. भास्कर कुंभार, प्रा. सुनील माने, प्रा. एस आय मुल्ला, प्रा. शुभम गिड्डे, प्रा. पी एस पाटील, प्रा. आदित्य चव्हाण, प्रा. प्रियांका लंबे, अमोल भोसले, प्रदीप खामकर, प्रतीक पाटील, बसवराज बिराडे तसेच संस्थेच्या विविध शाखांचे शाखाप्रमुख, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.




