आसाममध्ये पुराचा कहर! ८२ जणांचा मृत्यू; २५ वर्षांच्या श्रावण कुमारने लाकडी होडीच्या जोरावर वाचवले २ हजार जीव
शिवसागर : आसाममध्ये भीषण पुरामुळे हाहाकार उडाला असून आतापर्यंत तब्बल ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांना या पुराचा मोठा फटका बसला असून सुमारे १ लाख ७८ हजार नागरिक प्रभावित झाले आहेत. तसेच १५ हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन अजूनही पाण्याखाली आहे. या अत्यंत भीषण परिस्थितीत नाझिरा भागातून एक कौतुकास्पद आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे, जिथे २५ वर्षांच्या एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून तब्बल २ हजार लोकांचे प्राण वाचवले आहेत.

ना कोणती बोट, ना ट्रेनिंग! 'तुलुंगा नावे'च्या सहाय्याने २ हजार जणांना वाचवले
शिवसागर जिल्ह्यातील नाझिरा भागात १९ जुलै रोजी दिखौ (Dikhow) नदीला आलेल्या भीषण पुरामुळे हाहाकार उडाला होता. विजेचे खांब पडल्याने वीज आणि संपर्क यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली होती. लोक जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर आश्रयाला गेले होते.
अशा कठीण प्रसंगात बीहुबोर येथील १० वी पर्यंत शिकलेल्या २५ वर्षीय श्रावण कुमार या तरुणाने अतुलनीय शौर्य दाखवले. कोणतेही आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नसताना आणि कोणतीही मोटार बोट नसताना, त्याने 'तुलुंगा नाव' (साधी लाकडी होडी) आणि आपल्या मित्रांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. रात्रीच्या गडद अंधारात जिथे अनुभवी नावाडी जाण्यास घाबरत होते, तिथे श्रावणने ५ गावांमधील लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि आजारी व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले. "मी स्वतःचे घर वाचवायला गेलो असतो, तर इतरांना वाचवायला कोणीच उरले नसते," असे भावूक उद्गार श्रावणने काढले.
मुख्यमंत्री डॉ. हिमंत विश्व शर्मा ४ दिवसांच्या दौऱ्यावर
राज्यातील पूरस्थिती, नदीकाठची धूप आणि मदतकार्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत विश्व शर्मा २ ते ५ ऑगस्ट दरम्यान शिवसागर, दिब्रुगढ आणि चराईदेव या जिल्ह्यांच्या ४ दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले असून सरकार पूरग्रस्तांना सर्व ती मदत पुरवेल, असे आश्वासन दिले आहे.




