'गेले काही दिवस मोदी आहेत कुठे? ते आता फेसबुक प्राईम मिनिस्टर!'; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींसह महायुतीवर हल्लाबोल
मुंबई: गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हिडिओ पोस्ट करत पेपरफुटी विरोधी कायदा, टास्क फोर्स आणि विविध आंदोलनांवर भाष्य केले आहे. पंतप्रधान तरुणाईशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. "गेले काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत कुठे? ते आता 'फेसबुक प्राईम मिनिस्टर' झाले आहेत," असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

"उद्धव ठाकरेंवर टीका करणारेच आता फेसबुकवर!"
रविवार, २ ऑगस्ट रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "कोरोना काळात जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते, तेव्हा हेच लोक त्यांना 'फेसबुक नेता' म्हणून हिणवत होते. वास्तविक पाहता कोरोना काळात बाहेर पडायला स्वतः मोदींनीच बंदी घातली होती. तेव्हा त्यांच्यावर टीका करणारे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आता कुठे आहेत? ते स्वतःच आता फेसबुकवर जनतेशी बोलत आहेत आणि काम करत आहेत. त्यामुळे मोदी हे सुद्धा आता 'फेसबुक प्राईम मिनिस्टर' झाले आहेत."
सिद्धिविनायक मंदिर चोरीवर राज ठाकरेंच्या दाव्याचे समर्थन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील चोरीबाबत केलेल्या दाव्यावर बोलताना राऊतांनी शिंदे गटाला लक्ष्य केले. राऊत म्हणाले, "सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या चोरीचा मुद्दा पूर्णपणे खरा आहे. राज ठाकरेंनी केलेल्या स्फोटामागे अत्यंत गंभीर सत्य दडलेले आहे. जेव्हापासून एकनाथ शिंदेंच्या माणसांच्या हातात सिद्धिविनायक मंदिराच्या तिजोरीच्या चाव्या आल्या आहेत, तेव्हापासून या चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे."
संजय राऊत यांनी केलेल्या या थेट आरोपामुळे आता राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




