दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.मंडळाच्या माहितीनुसार, बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा कधी?
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानंतर 8 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षांना सुरुवात होईल.
दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा कधी होणार?
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. त्यानंतर 15 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षांना सुरुवात होईल.
सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर होणार
मंडळाने सध्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून, विषयानुसार सविस्तर वेळापत्रक संबंधित विभागीय मंडळांच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम आणि अधिकृत विषयवार वेळापत्रक तपासून त्यानुसार परीक्षेची तयारी करावी, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.




