परतीचा पाऊस बॅकलॉग भरून काढणार; विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटणार? पंजाब डख यांचा अंदाज

परतीचा पाऊस बॅकलॉग भरून काढणार; विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटणार? पंजाब डख यांचा अंदाज

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात एकीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशा परिस्थितीत विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सप्टेंबरनंतरचा परतीचा पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यात चांगलाच बरसणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

परतीच्या पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले. या परतीच्या पावसाचा फायदा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांना होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज रात्रीपासून 15 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत विदर्भात चांगला पाऊस होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. हा पाऊस सोयाबीन पिकासाठी जीवनदान ठरू शकतो, असेही ते म्हणाले. यासोबतच देशभरातील 'एल-निनो'चा धोका टाळण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि इतर आवश्यक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंजाबराव डख यांनी केले.

पुढील काही दिवसांत राज्यात ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. यवतमाळसह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे स्थानिक पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि झाडे पडण्याचा धोका हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई आणि परिसरातही पावसाची शक्यता कायम असून नागरिकांनी प्रवास करताना तसेच सखल भागात जाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून जिल्हानिहाय इशारे आणि हवामानासंदर्भातील अपडेट्स सातत्याने जारी केले जात आहेत.