मराठवाड्याची दुष्काळाशी चाललेली जुनी लढाई संपणार; मुख्यमंत्र्यांची मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याची जाहीर ग्वाही
जालना : मराठवाडा हा महाराष्ट्रातील वारंवार गंभीर दुष्काळाचा सामना करणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथील भूभाग वर्षानुवर्षे तीव्र पाणीटंचाई आणि शेतीच्या नुकसानीशी संघर्ष करत आला आहे. अलीकडच्या काळात या भागाला कोरड्या दुष्काळासोबतच ओल्या दुष्काळाच्या संकटलाही तोंड द्यावे लागत आहे. मात्र, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्याची ठाम ग्वाही दिली आहे.

जाफराबाद आणि जालन्यात आयोजित भारतीय जनता पक्षाच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात आणि भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात होत असलेल्या परिवर्तनाचा उल्लेख केला. तसेच, मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठीचा महत्वाचा फॉर्म्युला देखील उपस्थितांसमोर मांडला.
दुष्काळमुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मराठवाड्याला नेहमीकरिता दुष्काळमुक्त करण्याचे आमचे धोरण आहे. एका बाजूला कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचे पाणी उजणी धरणात आणले जाईल, तर दुसऱ्या बाजूला पश्चिम वाहिनी नद्यांचे ८० टीएमसी पाणी कोकणातून थेट मराठवाड्यात आणि गोदावरीच्या खोऱ्यात वळवले जाईल."
पुढे बोलताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्धार व्यक्त केला, "या पिढीने दुष्काळ पाहिला आहे, परंतु येत्या काळात पुढच्या पिढीला कधीही दुष्काळ पाहू देणार नाही. मराठवाडा पूर्णपणे दुष्काळमुक्त करून दाखवणारच," असे प्रतिपादन त्यांनी केले.
जालना आता तीन ‘एस’ (3S) मुळे ओळखला जाणार
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी जालन्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासावरही भर दिला. जालन्याची ओळख आतापर्यंत प्रामुख्याने ‘स्टील’ आणि ‘सीड’ (बियाणे) मुळे होती. आता यामध्ये ‘सिल्क’ (रेशीम) ची भर पडल्यामुळे शहराला एक नवी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भविष्यात जालना शहर तीन ‘एस’ (Steel, Seed, Silk) मुळे ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रेशीम उद्योगाच्या प्रसाराविषयी बोलताना ते म्हणाले की, एकेकाळी भारत रेशीम निर्यात करत होता, मात्र आज ती आयात करावी लागत आहे. या क्षेत्रात भविष्यात मोठी संधी असून पैठण, येवला आणि जालन्यात घरोघरी महिलांना हातमाग उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.




