सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने मविआत खळबळ; बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला चर्चेत

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने मविआत खळबळ; बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला चर्चेत

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरात सध्या विधान परिषद निवडणुकीचे नाट्य रंगात आले असतानाच, आता महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. पुणे आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मविआने घेतलेल्या माघारीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच आता, "मतांची बेरीज नसेल तर कशाला लढायचे, असं म्हणणारे सुद्धा आमच्यात आहेत," असा खोचक टोला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला आहे. यामुळे उमेदवारी मागे घेण्यावरून मविआमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद निवडणुकीतील वाढत्या भ्रष्टाचारावर थेट बोट ठेवले होते. त्या म्हणाल्या, "सध्याच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणतीही रंगत दिसत नाही. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीप्रमाणे यात लोकशाहीचा उत्साह नाही, तर प्रचंड प्रमाणावर घोडेबाजार सुरू आहे. हाच घोडेबाजार होणार हे स्पष्ट असल्यामुळेच पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून महाविकास आघाडीने माघार घेतली आहे." सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.

खासदार सुळे यांच्या या विधानानंतर नाशिकमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मविआची बाजू मांडताना सुळे यांच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष आक्षेप घेतला. थोरात म्हणाले की, "महाविकास आघाडीत माघारीनंतर नाराजी नाटक आहे. मात्र, लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या मार्गावर अवलंबून भाजपाने अनेकांना माघार घ्यायला लावल्याचे दिसून आलंय. मतांची बेरीज नाही तर कशाला लढायचे? असे म्हणणारे सुद्धा आमच्यात आहे, असे त्यांनी म्हटले. थोरातांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.