नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का? शिंदे सेनेच्या संपर्कात 12 नगरसेवक, 5 कोटी निधीची चर्चा
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील तब्बल 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही नगरसेवकांच्या शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्या आहेत. संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने या नगरसेवकांना प्रभागनिहाय विशेष निधी देण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातही मोठी राजकीय घडामोड घडत आहे. शिंदे सेनेचे माजी रोहा तालुकाप्रमुख मनोज शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असून, त्यामुळे रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात एआयएमआयएमच्या नगरसेविका रोशन शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. पडताळणीदरम्यान सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचा निष्कर्ष निघाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे संबंधित प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजप उमेदवाराला नगरसेवक होण्याची संधी मिळू शकते.




