गिरीश महाजन–विजय चौधरींची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; एकनाथ-रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह भाषेचा दावा

गिरीश महाजन–विजय चौधरींची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; एकनाथ-रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह भाषेचा दावा

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कथित क्लिपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली असून, भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रक्षा खडसे या सध्या केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत, तर एकनाथ खडसे हे सातत्याने भाजपच्या स्थानिक आणि राज्यस्तरीय नेत्यांवर टीका करत असतात. अशा पार्श्वभूमीवर ही कथित ऑडिओ क्लिप समोर आल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. तसेच, याबाबत संबंधित नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.