राहुल गांधींच्या पुण्यातील ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब; प्रशांत जगताप आक्रमक होताच पोलिसांकडून हिरवा कंदील
पुणे (प्रतिनिधी) : येत्या 22 ऑगस्ट रोजी ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी अद्याप पोलिसांनी आम्हाला परवानगी दिलेली नाही. मात्र, पोलिसांनी परवानगी दिली किंवा नाही, तरी हा कार्यक्रम होणारच, अशी भूमिका काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतली होती. त्यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

प्रशांत जगताप यांच्या या भूमिकेनंतर पुण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर पुणे पोलीस राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला परवानगी नाकारणार की अगदी शेवटच्या क्षणी परवानगी देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.अखेर पुणे पोलिसांनी काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला कायदेशीर परवानगी दिली आहे. काही अटी आणि शर्तींसह पुणे पोलिसांकडून राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आल्याचं समजतं.
‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमात राहुल गांधी विशेषतः मुलींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला सुमारे 8 ते 10 हजार मुली उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पुणे हे मुलींच्या पहिल्या शाळेचं शहर आहे. त्यामुळे या ऐतिहासिक शहरात राहुल गांधी मुलींशी थेट संवाद साधणार आहेत.राज्यभरातून मुली या कार्यक्रमासाठी नोंदणी करत आहेत. मोठ्या संख्येने मुली पुण्यात येऊन या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पेपर लीक, विद्यार्थ्यांच्या हक्कांची लढाई, मुली आणि महिलांवरील वाढते अत्याचार, अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर राहुल गांधी मुलींशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे मुलींना राहुल गांधींना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांसाठीही जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, राहुल गांधी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी प्रामुख्याने मुलींना देण्यात आली आहे.दरम्यान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरही प्रशांत जगताप यांनी टीका केली होती. विरोधकांना सातत्याने टार्गेट केलं जात असून, ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमालाही विविध अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
पुणे पोलिसांच्या कारवाईवरही प्रशांत जगताप यांनी प्रश्न उपस्थित केले होते. अस्तित्वात नसलेल्या किंवा अद्याप अंमलात न आलेल्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आणि अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर ते गुन्हे मागे घेण्याची वेळ आली. ही पुणे पोलिसांसाठी लाजीरवाणी बाब असल्याची टीकाही त्यांनी केली होती.अखेर आता पुणे पोलिसांनी राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाला परवानगी दिल्याने काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे.




