तटकरे कुटुंबाकडे नेमका कोणता जादूटोणा? शिवसेनेकडे संख्याबळ असूनही मुलाला आमदारकी, रामदास कदमांचा टोला

तटकरे कुटुंबाकडे नेमका कोणता जादूटोणा? शिवसेनेकडे संख्याबळ असूनही मुलाला आमदारकी, रामदास कदमांचा टोला

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेत शिवसेनेकडे अधिक संख्याबळ असतानाही सुनील तटकरे यांच्या मुलाला आमदारकी मिळाल्याचा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी लगावला. तटकरे यांच्याकडे नेमका कोणता जादूटोणा आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भरत गोगावले यांना झेंडावंदनावेळी बाजूला उभं राहावं लागणं प्रोटोकॉलमध्ये बसणारं नव्हतं, असं मत कदम यांनी व्यक्त केलं. सुनील तटकरे खासदार, त्यांच्या कन्या मंत्री आणि आता कन्येकडे पालकमंत्रीपद? असं म्हणत रामदास कदमांनी तटकरे कुटुंबावर जोरदार निशाणा साधला.

रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांच्या नियुक्तीचं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी स्वागत केलं आहे. मात्र, ज्येष्ठतेचा योग्य सन्मान झाला पाहिजे, अशी भूमिका देखील कदम यांनी मांडली. रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार असताना पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला का? असा सवालही कदमांनी उपस्थित केला. संख्याबळाच्या आधारावर पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळायला हवं होतं, अशी खंत रामदास कदमांनी व्यक्त केली.

गेल्या अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम होता. अखेर हा तिढा सुटला असून शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून देण्यात आलं. यावेळी शिवसेनेनेही सहकार्य केलं. त्यानंतर रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांनाच मिळणार असल्याची चर्चा होती. अखेर गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळालं आहे.

यानंतर सर्वच स्तरातून त्यांचं स्वागत होत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीही भरत गोगावले यांचं स्वागत करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, दुसरीकडे सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरूनही रामदास कदम यांनी काही सवाल उपस्थित केले. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणातील काही भाग तटकरेविरोधातील राजकीय घडामोडींशी संबंधित आहे का? अशी शंकाही कदमांनी उपस्थित केली आहे.