‘मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात’; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही मोठं भाष्य

‘मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात’; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही मोठं भाष्य

पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्याआधी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही मोदींची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती. मात्र, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली. विशेष म्हणजे, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही हे वृत्त फेटाळून लावलं असून, पंतप्रधानांना लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून जनतेच्या प्रश्नांसंदर्भात भेटल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

आता युवा नेते युगेंद्र पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. तसेच, पंतप्रधान मोदी बारामतीत येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि सारंग लखानी यांच्या दिल्लीतील रिसेप्शन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी मोदींची भेट घेतली. यामध्ये युगेंद्र पवार हेही मोदींना भेटल्याचं दिसून आलं. आता युगेंद्र पवार यांनी पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी कदाचित बारामतीमध्ये येतील. शरद पवार यांच्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान शंभर टक्के बारामतीत येतील, असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचंही कौतुक केलं."मला पण त्यांचा अभिमान वाटतो. ते चांगल्या पद्धतीने काम करीत आले आहेत," असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं.

तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सत्तेतील सहभागाच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केलं. "मोदींना राष्ट्रवादीचे खासदार भेटले, तसं काही नाही. मी पण पंतप्रधानांना भेटलो. पंतप्रधान केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत, तर ते देशाचे पंतप्रधान आहेत," असं स्पष्टीकरण युगेंद्र पवार यांनी दिलं.तसेच, "कामानिमित्त भेटणं यात गैर काय आहे? सत्तेमधील लोकांना भेटून लोकांची कामं मार्गी लावण्यात गैर काय आहे?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, बारामतीच्या परिस्थितीवरूनही युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं. "बारामती पोरकी झाली आहे. दादा मोठे नेते होते, पुन्हा तसा दादा होणं शक्य नाही. दादांची नाळ बारामतीकरांशी जोडली गेली होती. आम्ही तसा प्रयत्न करतोय. सत्ता नसताना आम्ही लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, सत्तेतील लोकांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे," असं म्हणत नाव न घेता युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसून आलं."बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. दादांचा दरारा होता, मात्र तो दरारा आता राहिलेला नाही. सत्तेत असणाऱ्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि सरकारी अधिकाऱ्यांना ताकद दिली पाहिजे. दादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही."

"सत्ता नसतानाही आम्ही लोकांची कामं करीत आहोत. 50 वर्षे लोक आम्हाला साथ देत आले आहेत. त्यामुळे आम्ही काम करत राहू. नगरपालिकेत आमच्या नगरसेविका हे मुद्दे मांडत आहेत. दोन-तीन दिवसांत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना भेटून लोकांच्या अडचणी मांडणार आहोत."जर कोणी भ्रष्टाचार करीत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. बारामतीमध्ये हे चालू देणार नाही. त्यावर कडक कारवाई केली जाईल. आम्ही विरोधक म्हणून लढत राहू," असंही युगेंद्र पवार यांनी म्हटलं.