ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सध्या कोणत्याही निवडणुका नसतानाही ठाकरे गटातील शिवसेनेत वेगळा गट स्थापन होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील 7 खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, त्याबाबत एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’शी संबंधित चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे.

कृपाल तुमाने यांच्या म्हणण्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम चर्चा पूर्ण केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमध्ये वाढ होत असतानाच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
याच संदर्भात कृपाल तुमाने यांनी दावा केला की, ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात पोहोचले असून, संबंधित आमदार आणि खासदारांच्या पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होणे बाकी आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबाबत पक्षातील काही आमदार आणि खासदार नाराज असल्याने ते शिंदे गटात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “उबाठा गटातील कोणत्याही खासदाराशी आमचा संपर्क नाही. अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही. आम्हाला ‘ऑपरेशन टायगर’ची गरज नाही,” असे सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच, संजय राऊत यांनी संयमाने उबाठा गटाचे अस्तित्व टिकवून ठेवले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ठाकरे गटातील खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या चर्चांबाबत प्रतिक्रिया देताना भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले की, “ही चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. यापूर्वी तामिळनाडूमध्येही अशा प्रकारचा गट स्थापन झाला होता आणि एका पक्षात विलिनीकरणही झाले होते. मात्र, ठाकरे गटातील खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन होणार की नाही, हे संबंधित पक्षच ठरवू शकतो. भाजपचा याच्याशी कोणताही संबंध नाही. सध्या तरी कोणताही गट स्थापन झालेला नाही.”




