राधानगरी धरण १०० टक्के भरले ! ६ नं. चा स्वयंचलित दरवाजा उघडला

राधानगरी धरण १०० टक्के भरले ! ६ नं. चा स्वयंचलित दरवाजा उघडला

राधानगरी धरण ओव्हरफ्लो! भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर!

 कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली असून, जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे आता पूर्ण क्षमतेने भरू लागली आहेत. जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे राधानगरी धरण काल रात्री १०० टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाचा ६ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

 राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर काल रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी ६ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा आपोआप खुला झाला. या ६ नंबरच्या दरवाजातून सध्या १४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

विशेष म्हणजे, गेल्या २२ जुलैपासून धरणाच्या विद्युत गृहामार्फत १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात आधीपासूनच सुरू होता. आता ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडल्यामुळे नदीपात्रात एकूण २८२८ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत आहे. तर धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने प्रशासनाकडून भोगावती नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच, संभाव्य पुराची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.